Marathwada Sathi

अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही अजित पवारांचा निर्णय मान्य असेल अशा आशयाच्या प्रतिक्रिया आल्यामुळे या सगळ्या चर्चेत तेल ओतलं गेलं. या पार्श्वभूमीवर अखेर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या सर्व चर्चांवर मौन सोडलं असून प्रतिक्रिया दिली.

“सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. त्यानंतर रात्री मुक्कामाला मी मुंबईला जाणार आहे. मी वर्तमानपत्रात वाचलं की आमदारांची बैठक आहे वगैरे. १०० टक्के ही खोटी गोष्ट आहे. अशी कोणतीही बैठक नाही. पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. अजित पवारही याच कामात आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी कुणावरही नाही. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतोय. मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं पत्र असल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रातील वृत्तामध्ये करण्यात आला होता. त्यावरून अजित पवारांविषयी अनेक दावे-प्रतिदाव्यांना ऊत आला. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी “अजित पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल” अशी जाहीर भूमिका घेतली. तर काही आमदारांनी असं काहीही नसून आम्ही कुठेही सह्या केलेल्या नाहीत, असं म्हटलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना आता शरद पवारांनी त्यावर स्पष्टपणे भूमिका मांडत सर्व प्रकरणावर पडदा टाकला आहे.

Exit mobile version