Marathwada Sathi

बिहार निवडणूक निकालावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं. “तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढं चागलं असं मत होतं, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

Exit mobile version