Home बीड हंगामी वसतिगृह दिवाळीनंतर सुरू होणार!

हंगामी वसतिगृह दिवाळीनंतर सुरू होणार!

86
0

बीड : बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातून दरवर्षी ५ लाखांपेक्षा जास्त मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ऊसतोडणीसाठी जातात. मजुरांसोबत त्यांच्या मुलांचे स्थलांतर होऊ नये या दृष्टीकोनातून गावपातळीवर मुलांसाठी हंगामी वसतीगृह सुरू करण्यात येतात. यावर्षी कोरोनामुळे अद्यापही वसतिगृह सुरू झालेले नाहीत. जिल्हा परिषदेने तालुकास्तरावरून मुलांची संख्या मागवली असून ८ तालुक्यांची संख्या उपलब्ध झाली. तीन तालुक्यांची संख्या अद्यापही आली नसल्याने सर्व तालुक्यांची संख्या आल्यानंतर वसतिगृहांना मान्यता मिळणार आहे. दिवाळीनंतरच वसतिगृहांना सुरुवात होणार असल्याचे दिसून येत आहे. 
    बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू केले जातात. या वसतिगृहांना संख्येनुसार मान्यता दिली जाते. एका वसतिगृहामध्ये कमीत कमी २० मुलांची संख्या असावी, असा शासकीय नियम आहे. ऑक्टोबरपूर्वी मुलांची यादी एकत्रित करून त्यानुसार वसतिगृहांना मान्यता देण्याचे काम जि.प.चे सीईओ करत असतात. यावर्षी कोरोनामुळे आतापर्यंत शाळाच भरल्या नाहीत. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्यास उशीर झाला. ऑक्टोबर ते मार्च असे सहा महिने वसतिगृह सुरू असतात. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने तालुकास्तरावरून ऊसतोड मजुरांच्या मुलांची संख्या मागवली होती. त्यानुसार आठ तालुक्यांची २५ हजार १५९ मुलांची संख्या जि.प.कडे उपलब्ध झाली. बीड, आष्टी आणि गेवराई या तीन तालुक्यांची संख्या अद्यापही आलेली नाही. या तीन तालुक्यांची संख्या आल्यानंतर हंगामी वसतिगृहांना मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीनंतरच आता हंगामी वसतीगृह सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here