Home Uncategorized आत्महत्येची ‘पोस्ट’ टाकून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध…

आत्महत्येची ‘पोस्ट’ टाकून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध…

378
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे :नोकरी नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या करत आहे, अशी पोस्ट फेसबुकवर टाकून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेऊन पोलिसांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी ही पोस्ट पाहून तत्काळ तिचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ‘भरोसा सेल’च्या महिला साह्य कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन तरुणीचा शोध घेऊन तिचे मतपरिवर्तन केल्याने अनर्थ टळला.
तीस वर्षे वयाची सोनाली (नाव बदलेले) ही मूळची मुंबईची तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली होती. कोथरूड परिसरात ती भाड्याच्या घरात वडिलांसोबत राहत होती. लॉकडाउनमध्ये तिची नोकरी गेली. त्यानंतर तिला नोकरी मिळत नव्हती. यामुळे ती नैराश्यात गेली होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्या करणार असल्याबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिली. त्यानंतर ती घरातून गायब झाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना या पोस्टबद्दल माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याची दखल घेऊन महिला कक्षाच्या सहायक निरीक्षक सुजाता शानमे यांना शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांना तिचा शोध घेण्यास सांगितले. दामिनी पथकाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ‘फेसबुक’वरील माहितीच्या आधारे या तरुणीचा मोबाइल क्रमांक व राहत्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळवला. पण, हा मोबाइल क्रमांक बंद लागत होता. दामिनी पथकाच्या मार्शलने तरुणीच्या घराच्या पत्त्यावर धाव घेऊन तिच्या वडिलांना माहिती दिली. त्या वेळी त्यांनी तरुणी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर गेल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडून तरुणीच्या मित्र-मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यांना फोन केला. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी एका मित्राने कोथरूड परिसरात ती असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस व मित्रांनी कोथरूड भागात तिचा शोध घेतला. त्या वेळी ती एका मॉलच्या बाहेर बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला धीर देऊन कोथरूड पोलिस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी तिचे समुपदेशन करून मत परिवर्तन केले. तिला धीर देऊन वडिलांसोबत घरी पाठवले. तिच्या नोकरीसाठीदेखील प्रयत्न केले जातील, असा दिलासा तिला देण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून तरुणीला वाचविल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here