Home नाशिक संमेलनाध्यक्षपदी पहिल्यांदाच विज्ञान लेखक

संमेलनाध्यक्षपदी पहिल्यांदाच विज्ञान लेखक

547
0

९४ वे मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रथमच खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ.जयंत नारळीकर

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची रविवारी बहुमताने निवड करण्यात आली आहे.साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च या कालावधीत नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राजकीय व्यक्तीऐवजी साहित्यिकाच्या हस्ते करण्यात येईल.

संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रथमच खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखकाची निवड करण्यात आली. घटक संस्था, निमंत्रक संस्थांनी अध्यक्षपदासाठी डॉ. नारळीकर, कथाकार भारत सासणे, विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, विज्ञान कथालेखक बाळ फोंडके, कीर्तन परंपरेचे अभ्यासक रामचंद्र देखणे, साहित्यिक मनोहर शहाणे अशी सहा नावे सुचवली होती; परंतु कोणत्याही एका नावावर एकमत झाले नाही. अखेरीस मतदान होऊन डॉ. नारळीकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.

‘ते’ भाकीत खरे ठरले : डॉ. नारळीकर

माझी एक कथा ‘किलरेस्कर’मध्ये प्रकाशित झाली होती. ती वाचल्यानंतर ‘तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल’ असे मुकुंदराव किलरेस्कर मला म्हणाले होते. मुकुंदरावांचे ते भाकीत खरे ठरले, अशी भावना डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

मराठी भाषेसाठी महत्वाचे काम करणारे नारळीकर

खगोलशास्त्रात महत्वपूर्ण मूलभूत संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत हे ऐकून आनंद झाला. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत भाषांचा त्यांचा व्यासंग आहे आणि त्यावर त्यांचे प्रभूत्वही आहे. सोप्या शब्दांत विषयाचे मर्म उलगडून सांगायची वृत्ती आणि उर्मी, आपले गुरु डॉ. फ्रेड हॉईल (ज्यांनी ‘ब्लॅक क्लाऊड’ सारख्या अप्रतिम कथा-कादंबऱ्या ही लिहील्या) यांचा आदर्श यामुळे डॉ. नारळीकरांनी ‘आकाशाशी जडले नाते’सारखी खगोलशास्त्र सुलभ भाषेत समजावून, त्याची गोडी लावतील अशी वैज्ञानिक पुस्तके, ‘यक्षांची देणगी’सारखी विज्ञान कथांची पुस्तके, भारतीय शास्त्र-परंपरेचा वारसा समजावून सांगणारी पुस्तके व प्रेरणादायी आत्मचरित्र अशी उत्तम मराठी साहित्यनिर्मिती केली. मराठी भाषा टिकून राहण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी हे फार महत्वाचे काम त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here