Marathwada Sathi

सावरकर प्रकरण राहुल गांधींना भोवणार ; हिंदू महासंघ अंदमानचं तिकीट पाठवणार

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची माफी मागण्यास राहुल गांधींना सुचवलं जात असतानाच त्यांनी ‘माफी मागायला माझं आडनाव सावरकर नाही, गांधी आहे’ असं म्हणत आगीत तेल ओतलं होतं. हे प्रकरण आता चांगलंच चिघळलं आहे. दरम्यान, हिंदू महासंघाकडून राहुल गांधी यांच्यासाठी अंदमानचं तिकीट काढण्यात आलं आहे.
हिंदू महासंघ आज राहुल गांधी यांना अंदमान ची तिकीटे पाठवणार असून त्यांनी एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे आव्हान हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे.8 ft X 9 ft च्या काळ्या कोठडीत, ११ वर्ष राहून, एकाच भांड्यात प्रात विधी आणि जेवण करून, अगदी आत्महत्या करण्याचे विचार मनात येऊन सुद्धा महाकाव्य लिहिणारे, तेथील कैद्यांना शिक्षण देणारे, अंधश्रद्धा घालवणारे वीर सावरकर जर समजायचे असतील, त्यांचा त्याग समजून घ्यायचा असेल तर एक दिवस तरी त्या कोठडित रहा, असे दवे यांनी म्हटलं आहे.आजींचे संस्कार झाले असते तर राहुलजी असे बोललेच नसते, अशी टीकाही राहुल गांधी यांच्यावर करण्यात आली आहे.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजस्थान व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आलेले राहुल माफी मागण्याच्या मुद्द्यावर म्हणाले, ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’

Exit mobile version