Marathwada Sathi

अर्णव गोस्वामीवरील कारवाईशी राज्य सरकाचा संबध नाही- संजय राउत

मराठवाडा साथी न्यूज

मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिस कुणावरही अन्याय करत नाहीत. राज्यात कायद्याचंच राज्य असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. इथं सर्वकाही कायद्यानुसार चालतं. अर्णव गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही’, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूड उगवत नाहीत, अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

पत्रकारितेसाठी काळा दिवस नाही- राऊत

अर्णव गोस्वामी यांना अटक म्हणजे पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारितेसाठी हा काळा दिवस नसल्याचं म्हटलं आहे. राज्यात पत्रकार आणि पत्रकारिता अशा कुणालाही धोका नाही. आम्हीही पत्रकार आहोत. चुकीचं काही केलं नसेल तर जोरजोरात ओरडण्याची गरज लागत नाही, असा टोला राऊत यांनी गोस्वामींना लगावला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणीदरम्यान संबंधित चॅनेलवर टिप्पणी केली होती. त्या दिवसालाही काळा दिवस म्हणणार का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळायला हव्या, असा सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

Exit mobile version