Home बीड बोरगाव बुद्रुक शिवारात तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला!

बोरगाव बुद्रुक शिवारात तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला!

चार कर्मचारी जखमी

144
0

गेवराई : गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या हद्दीत अनाधिकृत वाळुचा उपसा सुरुच आहे. हा वाळु उपसा रोखण्यास महसूल आणि पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. बोरगाव बुद्रुक शिवारात चोरट्या पद्धतीने वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार यांना झाल्यानंतर तहसीलदाराच्या पथकाने त्या ठिकाणी जावून एका टिप्पर चालकास विचारपूस केली असता गाडीमध्ये आलेल्या काही लोकांनी पथकावर हल्ला केला. यात चार कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव बुद्रुक शिवारातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना झाल्यानंतर ते व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी अमोल कुरुळकर, तलाठी राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड हे दाखल झाले. बोरगाव ते कुरणपिंप्री रस्त्यावर या पथकाला पांढर्‍या रंगाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परला थांबवून त्यांनी चालकाशी विचारपूस केली तितक्यात पाठीमागून एक लाल रंगाची गाडी आली, जिचा क्र. एम.एच. 16 डी.झेड. 9701 असा होता. यातील लोकांनी पथकातील कर्मचार्‍यांना काठीने मारहाण केली. यामध्ये संजय शंकर नेवडे (वय 41), योगेश सुरेश शहाणे (वय 24), शिवशंकर सुरेश आतकरे (वय 26) आणि दिपक आसाराम राठोड (वय 37) यांना मारहाण केली. या मारहाणीत हे चौघे जण जखमी झाले असून या प्रकरणी संजय नेवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here