Marathwada Sathi

अल्पवयीन मुलीची विवाहासाठी परप्रांतात विक्री

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीची विवाहासाठी परप्रांतात विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने राजस्थान येथून तीन व मध्यप्रदेशातून एक अशा चार आरोपींना अटक केली. मानवी तस्करीच्या या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी साहाय्यक आयुक्त प्रशांत राजे उपस्थित होते. फरीद अली एहसान अली (३०) रा. बडनगर, मध्यप्रदेश, चंपादास बालुदास वैष्णव (३३) रा. देवडीया, राजस्थान, सुरेशदास जमनादास वैष्णव (४०) रा. देवडीया, राजस्थान व संजय पुरुषोत्तमदास वैष्णव (२३) रा. आनंदीयोका गुढा, राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी याप्रकरणात संतोष इंगळे, मुकेश राठोड व चंदा मुकेश राठोड सर्व रा. अकोला यांना अटक करण्यात आली होती. २७ जानेवारी रोजी येथील एका अल्पवयीन मुलीला संतोष इंगळे व अन्य चौघांनी पळवून मध्यप्रदेशात नेले होते. तेथे फरिद अलीच्या माध्यमातून तिची राजस्थानात वैष्णव कुटुंबाला विक्री करण्यात आली. तेथे तिचा संजय वैष्णव याच्याशी बालविवाह लावून देण्यात आला होता.

चंपादास व सुरेशदास या दोघांशी फरीद अलीने तो व्यवहार केला होता. दरम्यान, पीडित मुलीने तेथून पळ काढून गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले होते. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात प्रथम संतोष इंगळे, मुकेश राठोड व चंदा राठोड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथकराजस्थान व मध्यप्रदेशात पाठविण्यात आले होते.

या पथकाने फरीद अली, चंपादास, सुरेशदास व संजय या चारही आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना अमरावतीत आणण्यात आले. पीडित मुलींकडून आरोपींची शहानिशा करण्यात आल्यावर या प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये गुन्ह्याची वाढ करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने उपायुक्त सागर पाटील, साहाय्यक आयुक्त प्रशांत राजे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, महिला साहाय्यता कक्षाच्या पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे, सायबरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, देवेंद्र कोठेकर, राजेंद्र काळे, पंकज गाळे, विशाल वाकपांजर, मोहम्मद सुलतान, राहुल खंडारे, भुषण पद्मने आदींनी केली.

Exit mobile version