Marathwada Sathi

रोहित पवार अर्णब गोस्वामीला म्हणाले “अभिनेता”

भाजप नेत्यांनाही सुनावले खडेबोल

अहमदनगर: वास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी आज ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर दडपशाही व आणीबाणीचा आरोप केला जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांना ‘अभिनेता’ म्हणून हिणवलं आहे

‘सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाते. द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो, अशावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं,’ असा बोचरा टोला रोहित पवारांनी हाणला आहे.

‘याच ‘अभिनेत्या’मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ‘सोशल मीडिया हब’सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न मध्यंतरी केंद्राने केलेला होता. पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा प्रयत्नही त्यांच्याच सरकारनं केला होता. हे मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा?,’ असा खडा सवालही रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमधून केला आहे

Exit mobile version