Marathwada Sathi

भावाच्या मृत्यूचा बदला…


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबईत बोलावण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवर हनी ट्रप रचलं. तोही तिला भेटण्यासाठी मुंबईतील छोट्या काश्मिरात आला. पण, तिथे पोहोचल्यानंतर त्याला धक्काच बसला. सुदैवाने त्यांच्या हत्येसाठी हालचाली सुरू असतानाच पोलिसांनी धाव घेतली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतलं.
जून २०२० मध्ये मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात पार्किंगवरून दोन गटात भांडणं झाली. रिक्षावाल्यांच्या दोन स्थानिक गटांमध्ये रिक्षा पार्किंगवरुन टोकाचा वाद झाला. वादाचं पर्यावसन तुफान हाणामारीत झालं. यात मोहम्मद सादिकने २४ वर्षीय अल्ताफ शेखची हत्या केली आणि मुंबईतून पोबारा ठोकला. या हत्येनंतर सादिकने दिल्ली गाठली. तर इकडे अल्ताफच्या हत्येने त्याचं संपूर्ण कुटुंब शोकात बुडालं. त्याच्या बहिणीलाही मोठा धक्का बसला. बहीण यास्मिनने भावाच्या हत्येचा बदला घेण्याचा मनाशी निश्चय केला. सादिक दिल्लीत लपल्याची माहिती यास्मिनला मिळाली. भावाच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर यास्मिनने मालवणीत भागात राहणाऱ्या फारुख शेख (20), ओवेश नबिउल्लाह शेख (18), मोहम्मद मानिस सय्यद (20), कांदिवलीतील गणेश नगरमध्ये राहणारे निहाल झाकिर खान (32) आणि सत्यम कुमार पांडे (23) या भावाच्या मित्रांशी संपर्क केला. सगळ्यांनी मिळून सादिकच्या हत्येचा कट रचला.

इन्स्टाग्रामवरून टाकलं

सादिक यास्मिनला ओळखत होता. याची माहिती असल्याने यास्मिनने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट (बनावट खात) सुरू केलं. सादिकशी ओळख वाढवून आधी तिने त्याचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर सादिक प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याची खात्री झाल्यानंतर यास्मिनने त्याला मुंबईला बोलावलं. ९ जानेवारीला यास्मिनने त्याला आरेतील छोटा काश्मीर गार्डनजवळ भेटायला बोलावलं. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सादिक यास्मिनने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर सादिकला धक्काच बसला. तिथे यास्मिनऐवजी अल्ताफचे पाच मित्र त्याला भेटले. त्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवत अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं. त्यानंतर त्यांनी त्याला वसई नायगाव परिसरात घेऊन जाण्याचं ठरवलं. तिथेच हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा कट होता.

सादिकला जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवताना एका व्यक्तीने बघितलं. त्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्यानं त्याने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलतं हालचाली सुरू केल्या. रुग्णवाहिकेला ट्रेस करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केले. पण, आरोपींनी दुसरी कार भाड्याने घेतली. पश्चिम एक्स्प्रेस वे वरून त्यांची गाडी भरधाव निघाली. दहिसर चेक नाका ओलांडतानाच पोलिसांनी सादिकसह पाच जणांना ताब्यात घेतलं. यास्मिनसह सर्व आरोपींना आणि अल्ताफच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या सादिकला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Exit mobile version