Home औरंगाबाद परतीच्या पावसाचा धुमाकूळ, सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबादला झोडपले

परतीच्या पावसाचा धुमाकूळ, सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबादला झोडपले

13
0

नाल्यांचे पाणी घरामध्ये शिरले, झाड कोसळले

औरंगाबाद । सप्टेंबरमध्ये मोसमी पावसाने कहर केल्यानंतर आता परतीचा पावसानेही धुमाकूळ घालणे सुरु केले आहे. शुक्रवारी दुपारनंतर शहर परिसरात मुसळधार पावसाने चांगलाच दणका दिला. ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जवळपास दोन तास धुवाधार कोसळत होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक सखल भागात नदी नाल्याचे पाणी घरामध्ये शिरले.  एस बी कॉलेजसमोर झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले तर औषधी भवनच्या नाल्यामुळे अनेकांचे घरातील साहित्य पाण्यात गेले. तर दुसऱ्या दिवशी शनिवारीही दुपारी जोरदार पाऊस झाला.
शुक्रवारी सकाळपासूनच तापमान वाढल्याने गर्मी जाणवत होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु होताच नागरिकांची एकच धावपळ उडाली. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. नाल्यांना पूर आला. वाहतूक ठप्प झाली. नागरिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी मिळेल तिथे आसरा घेतला. काही भागात जोराचा तर काही भागात साधारणपणे पाऊस झाला.  

शहरातील मिटमिटा, पडेगाव, भिमनगर, भावसिंगपूरा, पहाडसिंगपूरा, बेगमपूरा, जयसिंगपूरा, लेबर कॉलनी, सिल्कमिल कॉलनी, ज्युबली पार्क, नंदनवन कॉलनी, औरंगपुरा, समर्थनगर, गरमपाणी, खडकेश्वर, गुलमंडी, सिटीचौक, शहागंज, जाफरगेट, जुना मोंढा, निराला बाजार, दलालवाडी, पैठणगेट, सिल्लेखाना, क्रांतीचौक, अजबनगर, खोकडपूरा, सिडको-हडकोसह जटवाडा, हर्सुल, जयभवानीनगर, गारखेडा, शिवाजीनगर, उल्कानगरी, सहकार कॉलनी, शहानुरमिया दर्गा, सातारा-देवळाई परिसर, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, विटखेडा, मुकुंदवाडी, रामनगर, विठ्ठलनगर, चिकलठाणा, रोषणगेट, कटकटगेट, किराडपूरा या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने नदी- नाले काठोकाठ भरुन वाहू लागले.

औषधी भवनच्या नाल्याचे पाणी घरामध्ये

औषधी भवनच्या नाल्याचे पाणी दलालवाडी भागातील घरांमध्ये शिरले. नाल्याला पूर आल्याने नागरिक घाबरले. अनेकांचे घरातील साहित्य पाण्यात बुडाले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर नागरिकांनी धाव घेतली. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना अर्जुन गाडेकर, करण गाडेकर या भावांनी मदत केली.

सरस्वती भुवन समोर झाड कोसळले

औरंगपुऱ्यात सरस्वती भुवन महाविद्यालयासमोर आलेल्या स्मार्ट शहर बसस्थानकाजवळील झाड अचानक कोसळले. झाड पडल्यामुळे त्या खाली अनेक वाहने दबल्या गेल्याने वाहनधारकांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here