Marathwada Sathi

राहुल गांधींना धक्का, शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका सूरत कोर्टानं फेटाळली

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत कोर्टने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी, याकरता राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला.

सूरतच्या सत्र न्यायालायने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळे राहुल गांधी यांचं संसदेतील सदस्यत्वही रद्द झालं. खासदारी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. परंतु, सूरत कोर्टाने त्यांची याचिकाच फेटाळून लावली आहे. राहुल गांधी आतता याप्रकरणी उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर होते. कोलार येथील एक सभेत बोलताना ‘सर्व चोरांची आडनावं मोदी कशी काय असतात?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. या वक्तव्यावरून भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान केल्याचं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं.

Exit mobile version