Marathwada Sathi

ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “राधा” लघुपटास मानांकन

औरंगाबाद : ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये डॉ. राजेश इंगोले निर्मित-अभिनित, प्रमोद अडसुळे लिखित आणि प्रा. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शीत “राधा” लघुपटाची अंतिम फेरीत निवड झाली आहे .17 फेब्रुवारी 2022 रोजी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म आणि एंटरटेनमेंट फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीत राधा लघुपट दाखल झाला आहे. जगभरातुन 3 हजार चित्रपट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या महोत्सवात अंतिम फेरीत राधा लघुपटास मानांकन मिळाले आहे. राधा लघुपटाचे लेखन-छायांकन प्रमोद अडसुळे, निर्मिती प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व अभिनेता डॉ. राजेश इंगोले आणि दिग्दर्शन प्रा. सिद्धार्थ तायडे तर संवादलेखन रानबा गायकवाड व संकलन शरद शिंदे यांनी केले आहे. या लघुपटात डॉ. राजेश इंगोले, वैष्णवी नागरगोजे,ओम गिरी,मधुरा आडसुळे, नागनाथ बडे (नाना),रानबा गायकवाड,बालाजी कांबळे,पुजा कांबळे,दत्ता वालेकर,चंदा चांदणे, विकास वाघमारे ,नवनाथ दाणे,रतनहरी बडे, अनंत सोळंके,विद्याधर शिरसाट,पंकजा बडे,चैतन्य बडे,भगवान बडे,ऋषी वालेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाने ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात मानांकनासह गेल्या चार वर्षात राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले. यात गोवा फिल्म फेस्टीव्हल पाठोपाठ कोलकात्याला झालेल्या कल्ट राष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये ह्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.


“राधा ” हा संघर्षं कन्येची यशोगाथा अधोरेखित करणारा लघुपट आहे. बुद्ध, संत रविदास, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांच्या प्रेरणेतून प्रत्येक राधा गरुडझेप घेऊ शकते हा सामाजिक संदेश यातून देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन आणि व्हीईए फिल्म्स व एस. क्रिएटीव्ह स्टुडिओ निर्मित राधा या लघुपटास ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लघुपटात मानांकन मिळाल्याबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version