Marathwada Sathi

पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रम सुरू होणार:पदवी तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश


पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच ड्रोन तंत्रज्ञान विषयातील ड्रोनआचार्य या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रसेनजीत फडणवीस, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य डॉ.सतीश देशपांडे , विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर, इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. संजय ढोले, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, ड्रोन आचार्यचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव, सतीश कुलकर्णी, सुहास सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ड्रोनचा वाढता उपयोग लक्षात घेता भविष्यात या विषयात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात असे सांगत डॉ.अभ्यंकर म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानातील केवळ ड्रोन पायलट प्रशिक्षणच नाही तर ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रेपेरींग अँड मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, कृषी नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर आणि कोडिंग आदी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला आहे असेही डॉ.अभ्यंकर यांनी सांगितले.या विषयाची अधिक माहिती पुढील काळात तंत्रज्ञान विभागाच्या संकेस्थळावर जाहीर केली जाईल, असेही डॉ.अभ्यंकर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version