Marathwada Sathi

टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश

पुणे : टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याच्या वडिलांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. केदार जाधवने सोमवारी पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये वडील हरवल्याची तक्रार दाखल केली होती. केदार जाधवने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ८५ वर्षांच्या वडिलांचा तपास सुरू केला. पुण्यातल्या कोंढवा परिसरात पोलिसांना केदार जाधवच्या वडिलांचा शोध लागला.केदार जाधव त्याचे वडील आणि कुटुंबासह कोथरूड भागात राहतो. केदारचे वडील महादेव जाधव सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घराबाहेर पडले आणि रिक्षात बसले, यानंतर ते गायब झाले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये ५ फूट ६ इंच उंची असलेल्या महादेव जाधव यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची ट्राऊजर, काळी चप्पल आणि मोजे घातले होते, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला शस्त्रक्रियेच्या खुणा होत्या.महादेव जाधव यांच्या उजव्या हातांच्या बोटांमध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या होत्या, तसंच त्यांच्याकडे कोणता मोबाईल फोनही नव्हता. केदार जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो आणि फोन नंबरही शेअर केला होता. यामध्ये त्याने वडिलांना स्मृतीभ्रंश झाल्याचा उल्लेखही केला होता, तसंच सापडल्यास संपर्क करण्याचं आवाहनही केलं होतं.केदार जाधवने २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ७३ वनडे सामन्यांमध्ये त्याने ४२.०९ च्या सरासरीने १,३८९ रन केले, यात त्याने १०१.६० च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, यामध्ये २ शतकं आणि ६अर्धशतकांचा समावेश आहे.केदार जाधवने वनडे क्रिकेटमध्ये २७ विकेटही घेतल्या. २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध केदारने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने २०.३३ च्या सरासरीने १२२ रन केले. केदारने त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच न्यूझीलंडविरुद्ध २०२० साली खेळली

Exit mobile version