Home महाराष्ट्र प्रवासी देवो भव : यंदा दिवाळीत दरवाढ नाही

प्रवासी देवो भव : यंदा दिवाळीत दरवाढ नाही

267
0

मुंबई । दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून ३० टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे. मात्र यंदा कोविड – १९ च्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या ” प्रवासी देवो भवः” या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे असे मंत्री परब यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here