Marathwada Sathi

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान!

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून, मतपेट्या मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या आहेत. परळी तहसील कार्यालयात गुरुवारी मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. तद्नंतर लगेच मतपेट्या आणि मतदान साहित्याचे त्यांना वितरण करण्यात आले. दुपारच्या सुमारास सर्व कर्मचारी नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी मतदान प्रक्रिया पार पाडत असतांना कोणती काळजी घ्यायची? आपत्कालीन स्थितीत काय करायचे? याबद्दल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी येत्या शुक्रवारी मतदान होत आहे. ज्याची मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत 11 जागांसाठी 25 उमेदवार, गडदेवाडी 7 जागांसाठी 15 उमेदवार, सरफराजपूर 7 जागांसाठी 14 उमेदवार, रेवली 9 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. भोपला येथे 7 जागांसाठी 14 उमेदवार, वंजारवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे तर लाडझरीत 9 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.  07 ग्रामपंचायतच्या एकूण 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. मतदान होत असलेल्या गावांमध्ये एकूण 17 मतदान केंद्र स्थापित करण्यात आले असून, मतदान केंद्र अधिकारी, मतदान केंद्रावरील कर्मचारी, पोलीस असे 102 पेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तर चार झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version