Marathwada Sathi

पिंगळे हत्याकांड….

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : कुख्यात सुमित पुरुषोत्तम पिंगळे (वय २४, रा. चंद्रनगर) हा सतत धमकी द्यायचा. जिवाच्या भीतीनेच त्याला ठार मारले, असे अटकेतील बाप-लेकाने पोलिसांना सांगितले.पिंगळे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली. या तिघांनाही पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. निहाल देवेंद्र जोशी (वय २७), त्याचे वडील देवेंद्र मंगरूजी जोशी (वय ५१, रा. न्यू बालाजीनगर) व ऋषभ अरविंद राऊत (वय २४) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.सुमित हा कुख्यात गुन्हेगार होता. निहालने आपल्याबाबत पोलिसांना टिप दिल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे सुमित हा निहालला धमकी द्यायचा. सुमित आपल्याला ठार मारेल, अशी भीती निहालला होती. सुमितने मित्र ऋषभच्या मदतीने सुमितची हत्या करण्याचा कट आखला. रविवारी दुपारी सुमित हा न्यू बालाजीनगरमधील राहुल जेन्ट्स पार्लर येथे कटिंग करायला आला. काही वेळात निहाल व ऋषभ दुकानात घुसले. त्यांनी चाकूने सपासप सुमितवर वार केले. याचदरम्यान निहालचे वडीलही तेथे आले. त्यांनीही सुमितवर रॉडने वार केले. सुमितचा मृत्यू झाल्यानंतर निहाल व त्याच्या वडिलांनी अजनी पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. उशिरा रात्री पोलिसांनी ऋषभलाही अटक केली. तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी घेतली.

Exit mobile version