Marathwada Sathi

मंदिरे उघडण्यास परवानगी, मात्र ‘या’ नियमांची अट

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडताना सोमवार (१६ नोव्हेंबर) पाडव्यापासून कंटेन्मेंट झोन वगळता राज्यभरातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. यावेळी सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळात कोरोनासंदर्भातील सोशल डिस्टनसिंगचे पालन करून, हात पाय स्वच्छ धुवून, फेस मास्क लावूनच प्रवेश द्यावा, असे राज्य सरकारच्या नियमावलीत सांगण्यात आले आहे.
वयोवृद्ध, आजारी, गरोदर महिला, 10 वर्षाखालील लहान मुलांना मंदिरात प्रवेश नसणार असल्याचे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिरे उघडली जात नसल्याने राज्य सरकारवर टीका केली जात होती. अखेर सोमवारपासून राज्यभरातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन मंदिर प्रशासनाने करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
हे आहेत नियम
राज्य सरकारने बनवलेल्या नियमानुसार मंदिर आणि प्रार्थना स्थळांनी नेमून दिलेल्या वेळेतच भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. 65 वर्षांवरील नागरिक, विविध आजार असलेले नागरिक, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात मूर्ती आणि धार्मिक ग्रंथांना हात लावू नये. मंदिरात दोन व्यक्तींमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. मंदिरात प्रवेश देताना प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासावे लागणार आहे. कोरोनाची लक्षणे नसतील अशा व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश देण्यात यावा, तसेच मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावेत, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
मंदिर प्रशासनाला नियमावली –
मंदिरात भजन, कीर्तन, आरती बोलण्यास बंदी असणार असल्याने रेकॉर्डिंग भजन, कीर्तन, आरती लावावी. प्रसाद वाटप आणि जल शिंपडण्यावर बंदी असणार आहे. अन्नदान, लंगर, भंडारा करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. मंदिरात वेळोवेळी स्वच्छता राखावी लागणार आहे. मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला मंदिरात क्वारंटाईन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार असून त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहे. मंदिरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास परिसर सॅनिटाईझ करावा लागणार आहे.

Exit mobile version