Home होम पाटलांची स्वकियांकडूनच कोंडी….!

पाटलांची स्वकियांकडूनच कोंडी….!

237
0

मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर:
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांची कोंडी करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे जिल्ह्यातील सर्वपक्षीय विरोधक सरसावले आहेत. भाजपच्या मदतीने विखेंनी यावेळची व्यूहरचना आखण्याचे ठरविले आहे, नेते विरोधी आघाडीला जाऊन मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे यांच्या विरोधात आघाडी उघडली असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही त्यांना उघड पाठबळ मिळत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना एकत्र करून बँकेची सत्ता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले खरे, मात्र जिल्ह्यातील विचित्र राजकारणाचाच त्यांना अनुभव आला आहे. ज्या पैलवानांच्या मदतीने ते पवारांविरुद्ध दुसरी कुस्ती खेळण्याच्या तयारीत आहेत, ते पैलवान लढण्याआधीच त्यांचे मैदान सोडून विरोधी फडात जाण्याच्या तयारीत आहेत.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल झाले आहेत. दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यातील एक राष्ट्रवादीची तर एक भाजप म्हणजे विखेंच्या गटाची आहे. जिल्हा बँकेवर थोरात गटाचेच कायम वर्चस्व राहिले. विखे व थोरात दोघेही काँग्रेसमध्ये असताना हेच चित्र होते. थोरातांना त्यावेळीही भाजपची साथ मिळत होती. आता विखे भाजपमध्ये गेल्यानंतर फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजपची साथ मिळवू अशी त्यांची अटकळ असावी, मात्र यात यश येताना दिसत नाही. जुनी खुन्नस काढण्यासाठी भाजपचे संबंधित नेते यावेळीही थोरांतानाच साथ देण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे व विखे या तिघांची समितीची स्थापन करण्यात आली. मात्र, समितीमधील कर्डिले स्वत: थोरात यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. तर भाजपच्या समितीची बैठकच अद्याप झालेली नाही. कर्डिले स्वत: उमेदवार आहेत. तेथे थोरातांच्या सोबत सहमती घडविण्याच्या बैठकीला गेले होते. त्यांच्यासोबत कोपरगावमधील भाजपचे उमेदवार विवेक कोल्हे हेही होते. यासंबंधी कर्डिले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘महसूल मंत्री थोरात यांनी फोन करून बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आम्ही गेलो होतो. बैठकीत चर्चा झाली. भाजपच्या समितीत आपण आहोत, हे खरे आहे. मात्र, या समितीचे नेमके काम अद्याप कळालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समन्वय करा, असे सांगितले होते, त्यानुसार ते केले’, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या समितीत असूनही थोरांतांच्या बैठकीला कसे गेलात या प्रश्वाचे उत्तर देताना, ‘विखेंनी आजवर घालून दिलेल्या मार्गानेच आम्ही काम करीत आहोत,’ असा टोला कर्डिले यांनी लगावला.
माजी मंत्री शिंदे यांचा उमेदवारी अर्ज नाही. शिवाय त्यांनी यात फारसे लक्षही घातलेले नाही. मुळात भाजपचे हे सर्व पराभूत आमदार विखेंवर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत विखे यांनी खेळ्या करून आपला पराभव केल्याचा उघड आरोप या आमदारांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची दखल घेऊन पक्षाने चौकशी समितीही नियुक्त केली. मात्र, पुढे त्यावर काहीच झाले नाही. त्यामुळे या आमदारांच्या मनात विखे यांच्याविरोधातील भावना कायम आहे. बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विखे यांना आणि पक्षालाही याची जाणीव करून देण्याची संधी त्यांना मिळाली आहे. थोरात यांच्या गटाला खुद्द पवार यांच्याकडूनही पाठबळ मिळत आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सर्व संबंधितांची बैठक होत आहे. त्यामध्ये उमेदवार आणि पुढील रणनीती ठरणार आहे. तर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे बंड मोडण्यासाठी राज्य स्तरावरील नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. त्यात यश आले नाही तर यावेळी फडणवीस यांना लढण्याआधीच मैदान सोडावे लागले, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here