Marathwada Sathi

बनावट लग्न लावून दागिन्यासह दीड लाख रोख लंपास करणारी टोळी जेरबंद

औरंगाबाद : बनावट लग्न लावून दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी जेरबंद केले. संगिता विश्वनाथ वैद्य, अर्चना देविदास ढाकणे, सविता राधाकिसन माळी, पूजा अजय राजपूत आणि रवि तेजराव राठोड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील गणेश भाऊसाहेब पवार (२७, रा. कारेगाव) याला मोबाईलवर फोन करून शहरात बोलावून घेतले. त्याला सविता माळी हिने अर्चना शिंदे नावाच्या महिलेने स्थळ असल्याचे सांगितले होते. लग्न करायचे असेल तर मुलीचे दागिने आणि दीड लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. या टोळीने गणेश पवारच्या मोबाईलवर फोटो देखील पाठवला होता. रविवारी मुकुंदवाडी, रामनगर येथे बोलावून घेत लग्न कुंभेफळ येथील मंदिरात करू असे सांगितले. त्यानुसार, सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिन्यांसह दीड लाख रुपये रोख देत कुंभेफळ येथील मंदिरात गळ्यात हार टाकले. पुन्हा येऊन नोंदणी विवाहासाठी मुलीचे कागदपत्रे घेऊन येते असे सांगून सर्व जण पसार झाले. त्यावरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून पाच जणांच्या टोळीला गजाआड केले.

Exit mobile version