Marathwada Sathi

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजने करतोय नवी सुरुवात

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. त्याने या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. पण या कार्यक्रमानेही काही दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण ओंकार थांबला नाही. आता तो एका नव्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘करुन गेलो गाव’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकामध्ये ओंकार भाऊ कदमसह काम करत आहे. ओंकारचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. या नाटकामध्ये महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणं ही ओंकारसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं तो म्हणतो. शिवाय भाऊ कदमबरोबर काम करतानाही त्याला वेगळीच मजा येत आहे.

पहिल्याच व्यावसायिक नाटकामध्ये काम करण्याबाबत ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत ओंकार म्हणाला, “आपण जे काम करत आहोत त्याचा प्रत्येक कलाकाराला अभिमान वाटतो. मी जे काम करतो त्यामधून मला समाधन व आनंद मिळतो. हे नाटक करत असताना मला माझा अभिमान वाटतो. कारण मी कोकणातला आहे. कोकणाचं प्रतिनिधीत्व करणारं हे नाटक आहे”.

“एखाद्या कोकणी कलाकाराला कोकणी नाटक करायला मिळणं यासारख दुसरा आनंद नाही. माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. त्यातही भाऊ कदम यांच्याबरोबर काम करायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. नाटकांचा माझा काही सराव नाही किंवा नाटकाचा मला कोणताच अनुभवही नाही. आता नाटक मला कितपत जमेल ही मीच स्वतः पाहणार आहे. त्यासाठी मी खूप उत्सुक आहे”. ओंकार आता नाटकामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसेल.

Exit mobile version