Home महाराष्ट्र ‘ऑक्सफर्ड’कडून गंजाम व धारावीतील कोरोना पॅटर्नची दखल

‘ऑक्सफर्ड’कडून गंजाम व धारावीतील कोरोना पॅटर्नची दखल

480
0

मुंबई । जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेपाठोपाठ ऑक्सफर्ड विद्यापीठाने धारावीच्या कोरोना पॅटर्नची दखल घेतली आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला. याबरोबरच ओडिशातील गंजामचे मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या कामाचीही दखल घेण्यात आली आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लहान भागांवर लक्ष केंद्रित करायला हवे, ही बाब ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 310 शहरांचा अभ्यास केल्यानंतर कबूल केली. ओडिशातील गंजाम आणि महाराष्ट्रातील धारावीकडून हे शिकता येऊ शकते. तिथे हजारो जण कोरोनाग्रस्त होते, मात्र आजच्या घडीला तिथे 200 पेक्षाही कमी रुग्ण आहेत. ऑक्सफर्ड आणि पूर्वोत्तर विद्यापीठांच्या टीमने याविषयी संशोधन केले होते. जास्त लोकसंख्या असलेल्या लहान वस्तीत कोरोना संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर आले. खेड्यांच्या तुलनेत शहरी भागात संसर्ग वेगाने पसरत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. माद्रिद आणि लंडनसारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या भागाकडे लक्ष न दिल्याने कोरोना संसर्ग वाढला. प्रत्येक शहरासाठी सारखी पद्धत असेलच असे नाही, परंतु स्क्रीनिंगची पद्धत सारखीच असावी, असेही ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटले आहे.
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात 2 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. ऑगस्टमध्ये कोरोना वाढीचा दर 59 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे आता 20 हजार 430 रुग्णांपैकी 98 टक्के संपूर्ण बरे झाले आहेत. केवळ 188 रुग्ण बाधित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here