Marathwada Sathi

निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने…….


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : घराच्या मालकीवरून कौटुंबिक वादातून एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आपला भाऊ व दुसऱ्या स्वर्गवासी भावाची पत्नी यांना चाकूने भोसकल्याचा प्रकार किसननगरमध्ये घडला. या हल्ल्यात २८ वर्षीय भावाचा जागीच मृत्यू झाला असून भावजय गंभीर जखमी झाली आहे.याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी निवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कर्डक यास अटक केली आहे.महेंद्रने पोलिस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वागळे इस्टेट येथील किसननगर नंबर दोनमधील विजय सदन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नीता कर्डक (४३) यांच्या घरात त्यांचा दीर महेंद्र कर्डक (५५) राहत होता. नीता यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर हे घर झाले होते.
घरासाठी त्यांनी वारंवार विनवण्या केल्या होत्या. घराचा ताबा घेण्यासाठी त्या इमारतीत आल्या असता त्यांचे व महेंद्रचे कडाक्याचे भांडण झाले. कौटुंबिक वादाची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळताच गस्तीवरील बीट मार्शल पोलिस शिपाई राठोड व धोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नीता व महेंद्र यांच्यातील वाद सोडवण्यासाठी नीता यांचा दुसरा दीर अजय कर्डक धावून आला. मात्र संतप्त महेंद्रने दोघांवर चाकूने हल्ला केला. त्यात अजयचा जागीच मृत्यू झाला तर नीता याही रक्तबंबाळ झाल्या. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले. राठोड व धोंडे यांच्या प्रसंगावधानामुळे नीता यांचे प्राण वाचू शकले, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. धोंडे व राठोड यांनी महेंद्रचा शोध घेतला, तेव्हा तो त्याच्या खोलीत होता व स्वतःवर वार करण्याची धमकी देत होता. मात्र धोंडे यांनी मोठ्या कौशल्याने त्याच्या हातातील चाकू काढून घेतला.

Exit mobile version