Marathwada Sathi

माजलगावच्या नूतन नगराध्यक्षांचे पद धोक्यात!

औरंगाबाद / माजलगाव नगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर दुसर्‍या नगराध्याक्षाची निवड नगरसेवकातून करण्यात आली. या बाबत औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने राज्य शासन, महाधिवक्ता, विभागीय आयुक्त, बीडचे जिल्हाधिकारी व माजलगाव नगर परिषदेला नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तत्कालीन भाजप सरकारने जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातल्या नगराध्यक्षांच्या निवडी झाल्या. माजलगावचे तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचे पद अपात्र ठरवण्यात आले. पद अपात्र ठरवण्यात आल्यानंतरही पुन्हा नगराध्यक्ष जनतेतून निवडावा असे तत्कालीन सरकारचे आदेश होते. मात्र सध्याच्या विद्यमान सरकारने यामध्ये बदल करून नगराध्यक्ष नगरसेवकातून निवडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माजलगाव नगराध्यक्ष पदाचा नवीन नगराध्यक्ष नगरसेवकातून निवडण्यात आला. यामध्ये शेख मंजूर यांची निवड करण्यात आली. याबाबत माजलगावचे नगरसेवक विनायक रत्नपारखे यांनी अ‍ॅड.सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमुर्ती संजय गंगापुरवाला, न्यायमुर्ती आर.जी.अवचट यांच्यासमोर सुनावणी झाली असून खंडपीठाने राज्य शासन महाअधिवक्ता, विभागीय आयुक्त, बीड जिल्हधिकारी व माजलगाव नगर परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेनुसार 2016 च्या दुरूस्तीनुसार जनतेमधून नगराध्यक्षांची निवड व्हावी. पद रिक्त झाल्यास पुन्हा जनतेतून निवडुण द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार आहे.

Exit mobile version