Home Uncategorized सेनेतील नवे चेहरे……!

सेनेतील नवे चेहरे……!

281
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमध्ये अग्रेसर असणाऱ्या शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्या आणि पराभूत नेत्यांवर प्रकाशझोत अधिक असून मंचावर मिरविणाऱ्या नेत्यांमध्ये तीनदा निवडून येणाऱ्या आमदारांपेक्षाही पराभूत नेत्यांवरील प्रकाशझोत वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर ही जोडगोळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून नव्याने चर्चेत आली आहे. शिवसेना वाढावी म्हणून काम करणारे दिवाकर रावते आता दिसतही नाहीत तर जाहीर कार्यक्रमात आदित्य ठाकरे किंवा पहिल्या फळीतील नेत्यांनी भाषणात नाव घेतले तरी अप्रूप वाटावे, एवढी काही नेत्यांची केविलवाणी अवस्था होत असल्याचे दिसून येत आहे. सेनेतील नवे चेहरे श्रेयाच्या लढाईत पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडय़ात प्रचार करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडून मिळविली. अशी परवानगी मिळविण्यासाठी अर्जुन खोतकर त्यांच्या पाठीशी उभे राहतात. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लक्ष्य करत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णयावरही राज्यमंत्री सत्तार माध्यमांशी बिनदिक्कत भाष्य करतात. सेनेचा मराठवाडय़ाचा नेता अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ते खास प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या जोडीने अलीकडेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही जाहीर सभा घेतल्या. सर्वसाधारणपणे गावातील राजकारणात मंत्री आणि आमदार फार लक्ष घालत नाहीत. निवडून येणारा आपला असे सूत्र अवलंबिले जाते. पण सेनेच्या दोन नेत्यांनी घेतलेल्या सभांमुळे नवाच पायंडा पडत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेत शाखाप्रमुखांपासून ते वरची पायरी चढत जाणारे नेते मागच्या बाकावर आणि प्रकाशझोत मिळविणारे पुढे असे चित्र दिसून येत आहे. त्याला बीडच्या जयदत्त क्षीरसागर यांचा अपवाद आहे. बीड मतदारसंघ भाजप-सेना युतीच्या काळात शिवसेनेकडे असल्याने भाजपमध्ये जाता-जाता मातोश्रीवर जाणारे जयदत्त क्षीरसागर जाहीर कार्यक्रमात येतात. मागच्या रांगेत बसतात आणि निघून जातात. अलीकडेच औरंगाबादमध्ये ‘विकास संवाद’ कार्यक्रमात त्यांची हजेरी अशाच स्वरूपाची होती. तीन वेळा निवडून आलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी पक्षीय कार्यक्रमातील हजेरी अशी मागच्या बाकावर असल्यागत असते. त्यात खासदार चंद्रकांत खैरे यांचीही पडत आहे.भाजपमधून शिवसेनेमध्ये आवर्जून गेलेल्या किशनचंद तनवाणी यांच्यावर कोणतीही जबाबदारी नसल्याने तेही जाहीर कार्यक्रमातून फारसे दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या नव्या रचनेत अनेक चेहरे बाहेर फेकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.खासदार हेमंत पाटील हे अर्धे हिंगोलीचे आणि अर्धे नांदेडचे अशी त्यांची प्रतिमा आहे. बालाजी कल्याणकर हे तुलनेने नवखे आमदार असल्याने त्यांची फारशी कोणी दखल शिवसेनेमध्ये घेत नाहीत. तीन वेळा मतदारसंघ राखणारे उस्मानाबादचे आमदार ज्ञानराज चौघुले यांनाही त्यांच्या मतदारसंघाबाहेर ओळख मिळविता आली नाही. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपच्या गाडीतून शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार यांच्या मराठवाडय़ातील दौऱ्यांमुळे भुवया उंचावल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here