Home औरंगाबाद मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना चार देशांमधील तज्ज्ञाकडून मिळणार मार्गदर्शन

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना चार देशांमधील तज्ज्ञाकडून मिळणार मार्गदर्शन

703
1

असुदे फाउंडेशनच्या नॉर्थ स्टार उपक्रमाचा प्रशासकांच्या हस्ते शुभारंभ

औरंगाबाद : मनपा शाळेतील विद्यार्थांना आता चार देशांमधील प्रमुख मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. हा उपक्रम राज्यात सर्वप्रथम औरंगाबाद महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुक्रवारी प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. असुदे फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आणि व्यवसाय मार्गदर्शनासाठी याचा फायदा होणार आहे.

शुभारंभावेळी असुदे फाउंडेशनचे संचालक व्यंकटेश खारगे, अलेरिया मंतेरो, पंकज तांदूळकर, रत्नप्रभा बहाळकर, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व शशिकांत उबाळे यांची उपस्थिती होती. असुदे फाउंडेशनचे व्यंकटेश खारगे यांनी पालिकेअंतर्गत चार शाळांमध्ये राबविण्यात येणार्‍या नॉर्थ स्टार प्रोग्रामची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या उपक्रमासाठी नॉर्थ स्टार शोधत असताना ज्याप्रमाणे ध्रुवतारा सर्व तार्‍यामध्ये प्रखर असतो. तो सर्वांना मार्ग दाखवतो इतरांना प्रकाश देतो. अगदी त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी निवडण्यात येणार्‍या मार्गदर्शकांना नॉर्थ स्टार संबोधले जाते. हा प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोगी आहे, त्याचे महत्त्व, त्याचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे हे खारगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांकडून मिळणारी माहिती नक्कीच उपयोगी पडेल, अशी भावना आयुक्त पांडेय यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच पालिकेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व पालिका प्रशासन या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी या चार शाळांमध्ये उपक्रम

नॉर्थ स्टार हा उपक्रम प्रारंभी महापालिकेच्या प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी, प्राथमिक विद्यालय चिकलठाणा, प्राथमिक विद्यालय हर्सूल, प्राथमिक विद्यालय मिटमिटा येथे राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खारगे यांनी दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here