Marathwada Sathi

मुंडे यांनी भाजपला दिला मोठा धक्का…


मराठवाडा साथी न्यूज
बीड: पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राज्यभरात सुरु होती. भाजपच्या ३ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं गुरुवारी सांगण्यात आलं. पण, ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय. तसं प्रसिद्धी पत्रकच भाजपनं जारी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.
पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या ३ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलं. त्यावर आता भाजपनंही एक प्रसिद्धी पत्रक काढून ते सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा केला आहे. तसंच त्या सदस्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या देत राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केल्याचा आरोप भाजपनं केलाय.
भाजपचे ३ सदस्य अधिकृत चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असं पत्रक काढून राष्ट्रवादी काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे पंचायत समिती सदस्य असलेले भरत सोनावणे, मुरलीधर साळवे आणि मोहन आचार्य यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आपला विश्वास आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचं म्हटलंय.

Exit mobile version