Marathwada Sathi

केंद्राकडून हालचाली सुरु..


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून अनेक ठिकाणांची नावं बदलण्याची मागणी होत आहे. त्यामध्ये आता मुंबई सेंट्रल स्थानकाचीही भर पडली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे .
“गेली सहा वर्ष मी आणि माझे शिवसेनेचे सहकारी लोकसभेत पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना अलीकडेच यासंबंधी पत्र पाठवलं होतं. महाविकास आघाडीने विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर केला. मंजूर केल्यानंतर तुमच्याकडून फक्त प्राथमिक मान्यता मिळणं गरजेचं आहे, ती अजून मिळालेली नाही त्यामुळे आपण तातडीने लक्ष घालावं. याचं उत्तर त्यांच्या राज्यमंत्र्यांनी मला पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी प्रक्रिया सुरु असून अल्पवधीत मान्यता देऊ असं सांगितलं आहे,” अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय याआधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात नाना शंकरशेठ यांचं मोठे योगदान होतं. त्यामुळे नाना शंकरशेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी होत होती. शिवसेनेसाठी हा मराठी अस्मितेचा विषय आहे. प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येणार आहे.

Exit mobile version