Marathwada Sathi

राजभवनपर्यंत मोर्चा निघणार….!

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात ५५ दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि सीमाभागात शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेरींनंतरही आतापर्यंत काहीच तोडगा निघालेला नाही. सरकारने कायदे मागे घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तर कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार असल्याचे सरकारची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २५ जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या निदर्शनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने काही शेतकरी संघटनांनी घेतलेल्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला जाईल.
नवाब मलिक यांनी सांगितले, शेतकर्‍यांच्या वतीने नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजभवनाकडे मोर्चा काढण्यात येईल. यापूर्वीचं शरद पवार यांनी शेतीशी संबंधित या कायद्यांना विरोध दर्शविला होता. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील चर्चेची दहावी फेरी होणार आहे. ही चर्चा अशा वेळी होत आहे जेव्हा शेतकरी संघटनांनी 26 जानेवारीला लाल किला ते इंडिया गेटपर्यंत परेड काढण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version