Home औरंगाबाद प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या कारणावरुन जिवलग मित्रानेच काढला मॉन्टीचा काटा

प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या कारणावरुन जिवलग मित्रानेच काढला मॉन्टीचा काटा

12
0

आरोपी राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष, पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून पोलिसांनी केली अटक

मराठवाडा साथी न्यूज । औरंगाबाद
प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या कारणावरून उफाळलेल्या वादातून जिवलग मित्रानेच मॉन्टी सिंगची हत्या केल्याचे समोर आले आहे. कपिल उर्फ राजे राजीव रापते (२७, मुळ रा. परभणी) या आरोपीला छावणी पोलिसांनी पुण्याच्या कुरकुंभ गावातून मंगळवारी दुपारी अटक केली. रापते हा राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. हत्या झाल्याच्या दिवसापासून कपिल मोबाईल बंद करून फरार होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल रापते उर्फ राजे हा राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. तो मुळचा परभणीचा रहिवासी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मॉन्टी सिंग आणि कपिलची घट्ट मैत्री होती. मात्र, दोघांमध्ये अशात एका तरुणीवरुन चांगलेच वैर निर्माण झाले होते. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. रापते याला रेल्वे खात्याचे सोलारचे कंत्राट मिळाले होते. त्याचे मुंबईत ऑफिस आहे. त्यामुळे व्यवसाय चालवण्यासाठी रापतेला मुंबईत स्थायिक व्हायचे होते. त्याने कार्यालयाच्या उद्घाटनाची तयारी देखील सुरू केली होती. येत्या दोन महिन्यांतच चिकलठाणा परिसरातील कल्पक लॉन्स येथे रापतेचे लग्न होते. मात्र, मॉन्टी सिंग हा आपल्या प्रेयसीसोबत रापतेचे संबंध असल्याच्या संशयावरून त्याला मारण्याची भाषा करत होता. त्यातून दोघांमध्ये कायम धुसफूस सुरू होती. सध्या या दोघांमधील वाद टोकाला गेला होता. हे दोघेही एकमेकांना संपविण्याची भाषा करायचे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी मंगळवारी दिली. या वादातूनच मॉन्टी सिंगची कपिलने पोटात चाकू भोसकून खून केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हत्या झाल्याचे आले समोर
१८ आॅक्टोबर रोजी प्रेयसी मॉन्टी सिंगच्या फ्लॅटवर गेली होती. तेथे वाद झाल्यावरुन मॉन्टी सिंगने प्रेयसीला मारहाण केली होती. त्यानंतर १९ आॅक्टोबर रोजी मॉन्टी सिंगने प्रेयसीला घरी सोडल्यानंतर त्याने रात्री मित्रांसोबत मुकुंदवाडीत एका हॉटेलात पार्टी केली. रात्री एकच्या सुमारास फ्लॅटची चावी घेण्यासाठी तो पडेगावातील मित्र विशाल दामोदरेच्या घरी गेला होता. त्याच्याकडून चावी घेतल्यानंतर मॉन्टी सिंग फ्लॅटवर गेला होता. त्यानंतर त्याची चाकु भोसकून हत्या करण्यात झाली होती. मॉन्टी सिंगची कार मित्र संघर्ष अंभोरे हा घेऊन गेला होता. त्याची कार देण्यासाठी दोन दिवसांपासून अंभोरे मॉन्टी सिंगच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. मात्र, मॉन्टी सिंग मोबाईल घेत नसल्याने २१ आॅक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास अंभोरे, दामोदरे आणि कपिल चोपडा हे फ्लॅटवर गेले होते. त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा उघडताच मॉन्टी सिंगची हत्या झाल्याचे उघड झाले होते.
संशयावरून वाद टोकाला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्टी सिंग आपल्या प्रेयसीसोबत कपिल रापतेचे संबंध असल्याच्या संशयावरुन सतत वाद घालत होता. त्यामुळे दीड महिन्यापुर्वी दोघांच्या वादात एकाने मध्यस्थी केली होती. त्यासाठी मध्यस्थीने कपिल रापतेला फोन करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. संभाषणात कपिलने मध्यस्थीकडे मॉन्टी सिंगला संपवण्याची भाषा केली होती. याची रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागली आहे. याशिवाय मॉन्टी सिंगच्या मोबाईलमधील दोघांच्या वादाच्या रेकॉर्डींग पोलिसांकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी फेसबुकवर पोस्ट
मॉन्टी सिंगची हत्या झाल्यानंतर २० आॅक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कपिल रापतेने त्याच्या फेसबुकवर तिरुपतीला जात असल्याची पोस्ट टाकली आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती रेकॉर्डींग लागून देखील कपिलचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना त्याचे ठिकाण शोधणे कठीण जात होते. दरम्यान, कपिल हा तिरुपतीला गेलाच नसून तो पुण्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांचे पथक पुणे जिल्ह्यातील भुगाव, वाकड, ताटेवाडी, पिंपरी व अन्य भागात पाच दिवसांपासून कपिलला शोधत होते. मात्र, पुणे जिल्ह्यातच वारंवार कपिल ठिकाणे बदलत असल्याने त्याचा माग काढणे कठीण जात होते. अखेर मंगळवारी दुपारी पोलिसांनी त्याला पुण्यातील कुरकुंभ गावातून अटक केली.
पोलिसांचे पथक पाच दिवस मागावर
मॉन्टी सिंगची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यापासून कपिल याला पकडण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वायाळ, नागरगोजे, शिंदे, चिंधाळे, थोरात आणि पायघन यांच्या पथकाने पाच दिवसांपासून पुणे जिल्हा पिंजून काढला. अखेर सहाव्या दिवशी आरोपी कपिल त्यांच्या हाती लागलाच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here