Marathwada Sathi

भाजपच्या वेबसाईटवर या खासदारांच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला त्वरित ट्वीट करत कार्यवाही करा,नाहीतर सायबर सेल पुढील कारवाई करेल असे सूचित केले आहे. BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट असून भाजपच्या या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये कारण तो आक्षेपार्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, “भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसेजी यांचं अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसला. अशाप्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपनं दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल.”

या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देत खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, “ज्यावेळी मला यासंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा मी वेबसाईट चेक केली. त्यावेळी असा कोणताही उल्लेख माझ्या नावासमोर नव्हता. ज्या लोकांकडून हे व्हायरल झाले आहे, ते पेज सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी असे आहे. याच पेजवरुन यासर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. कदाचित माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन हे केलेले असावे, अशी माझी शंका आहे. तसेच पक्षालाही कळवलेलं आहे. त्यामुळे खर नक्कीच पुढे येईल.”

Exit mobile version