Home महाराष्ट्र MaharashtraNewsUpdate : नव्या वर्षाचे स्वागत कराच पण जरा जपून….

MaharashtraNewsUpdate : नव्या वर्षाचे स्वागत कराच पण जरा जपून….

508
0

लंडनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूनंतर राज्य सरकारने राज्यात महापालिका क्षेत्रांत येत्या ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केलेली असतानाच आता थर्टीफस्टसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाच्या गाइडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या आदेशात कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांना अनेक मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या असून ३१ डिसेंबर रोजी दिवसा संचारबंदी नसेल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य सण व उत्सवांप्रमाणे नववर्षाचे स्वागतही यंदा साधेपणाने केले जावे. कुठेही गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला जाऊ नये, यासाठीच या विशेष गाईडलाइन्स असल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

मावळत्या  वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात जरूर करा मात्र, आधीच असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात नव्या करोना विषाणूचा वाढलेला धोका लक्षात घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आवळत्या वर्षाला निरोप देताना आणि  नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी घराबाहेर पाडण्याचे धाडस न करता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, असे गाइडलाइन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

३१ डिसेंबरसाठी अशा आहेत गाइडलाईन्स

१. नागरिकांनी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे.

२. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

३. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने करोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

४. करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

५. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

६. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

७. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,

८. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचा मदत आणि पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

९. तसेच या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here