Marathwada Sathi

हनुमान जयंतीचा महाप्रसाद, ५० हून अधिक जणांना विषबाधा

नाशिक : नाशकातील सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे गावात हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर काहींना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. परंतु यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. ७ एप्रिल रोजी सकाळी काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी तातडीने ठाणगाव येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली. असे एक एक करून गावातील आरोग्य केंद्रात जवळपास ७० ते ८० जणांना अन्नातून विषबाधा झाली. यातील काही जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील असंख्य गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागला अशी माहिती नागरिकांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विषबाधेच्या घटनेनंतर आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

विषबाधा झाल्यानंतर बाधितांची संख्या ही आरोग्य केंद्रात वाढत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची देखील तारांबळ उडाली होती. बाधितांमध्ये काहींना प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर काही रुग्णांवर बाऱ्हे येथे उपचार सुरु आहेत. त्यातील प्रकृती गंभीर असलेल्या दोघांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे.

Exit mobile version