Marathwada Sathi

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन…?

मुंबई : “बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचे ,” राजेश टोपे यांनी म्हटले आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे यांनी यावेळी लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसत्ताशी बोलतानाही राजेश टोपे यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं.

“कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. राज्यात दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये उसळत असलेली गर्दी, चौपाटय़ा, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी यामुळे करोना प्रसार वाढत आहे. शाळा- महाविद्यालयांमध्ये करोना प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करणे, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध करणं, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणं, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे, मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणं, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Exit mobile version