Home होम खारघर, तळोजात सकाळची फेरी धोकादायक; ‘वातावरण’ संस्थेकडून उत्सव चौकाजवळ जनमत चाचणी

खारघर, तळोजात सकाळची फेरी धोकादायक; ‘वातावरण’ संस्थेकडून उत्सव चौकाजवळ जनमत चाचणी

5279
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी मुंबई : केंद्रीय नागरी मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पुण्यानंतर राहण्यास पसंतीदायक असलेले शहर म्हणून नवी मुंबईला प्राधान्यक्रम दिला होता, मात्र मागील काही दिवसांत खारघर, तळोजा आणि पनवेल या दक्षिण नवी मुंबईत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. या उपनगरांना खेटून जाणारा शीव-पनवेल महामार्ग आणि नवीन बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची मात्रा वाढली असून ‘वातावरण’ या पर्यावरण संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत खारघरच्या उत्सव चौकाजवळ लावण्यात आलेली कृत्रिम फुप्फुसे केवळ दहा दिवसांत काळीठिक्कर पडल्याची धक्कादायक बाब उघडीस आली आहे. हा प्रकार चिंताजनक आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शासकीय व खासगी बांधकाम प्रकल्प होत आहेत. त्याचबरोबर प्रदूषण वाढवणाऱ्या वाहनांची रहदारी या शहराच्या मध्यवर्ती भागातून जात आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारांत प्रदूषणाची पातळी वाढत असून नागरिकांना श्वसनाचे तसेच डोळ्यांचे विकार वाढले आहेत.

या भागात पर्यावरणविषयक काम करणाऱ्या ‘वातावरण’ या सामाजिक संस्थेने नोव्हेबर ते डिसेंबर या एक महिन्यात येथील प्रदूषणाची पातळी खासगीरीत्या तपासून पहिली. त्यात खारघर, तळोजा या क्षेत्रात सकाळी प्रभात फेरी करणे धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. याचा सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत असून येथील वातावरणात पीएम २.५ हा प्रदूषणकारी घटक अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. वाढत्या प्रदूषणाचा हा अहवाल संस्थेने पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना सादर केला, पण त्यांनी प्रदूषण तपासणे किंवा त्यावर उपाययोजना करण्याचे काम हे राज्य प्रदूषण मंडळाचे असल्याचे सांगून टोलवाटोलवी केली. पनवेल पालिका ही या शहराचे उत्तरदायित्व सांभाळत असल्याने पालिकेच्या वतीने प्रदूषण मंडळाकडे ही गंभीर बाब सांगता आली असती असे येथील नागरिकांचे मत आहे.

पालिका अथवा सिडको या वाढत्या प्रदूषणाबाबत गांभीर्याने पाहात नसल्याने वातावरणने १५ जानेवारीला सेक्टर ७ मधील वर्दळीच्या ठिकाणी ‘द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स’ अशी शीर्षके देऊन पांढऱ्या रंगाची कुत्रिम फुप्फुसे एका फलकावर लावली. फलकावर लावलेल्या दुसऱ्या दिवसांपासून ही फुप्फुसे काळी पडू लागली होती. दहाव्या दिवशी ही फुप्फुसे काळीठिक्कर पडल्याचे खारघरवासीयांनी पाहिले. कृत्रिम फुप्फुसे इतकी काळी पडू शकतात तर आपल्या हृदयाची फुप्फुसे येथील प्रदूषणाने किती काळी पडत असतील, असा प्रश्न खारघरवासीयांना पडला आहे. या वाढत्या प्रदूषणाची दखल किमान सरकारने आता तरी घ्यावी अशी अपेक्षा खारघरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. तळोजा एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणामुळे या भागात जास्त प्रदूषण वाढले आहे. हरित लवादानेही येथील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यात हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here