Home आरोग्य जूनचा पोषण आहार ऑगस्टमध्ये, रेकॉर्ड बदलण्यासाठी अधिकाऱ्यांसह आशा सेविकांची धावपळ

जूनचा पोषण आहार ऑगस्टमध्ये, रेकॉर्ड बदलण्यासाठी अधिकाऱ्यांसह आशा सेविकांची धावपळ

1683
0

मराठवाडा साथी न्यूज/औरंगाबाद
वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शे.पु. येथे मागील तीन महिन्यापासून पोषण आहार मिळाला नाही. तर सारवासारव करण्यासाठी जूनचा आहार ऑगस्ट मध्ये वाटण्यात आला असून देयकावर जून महिन्याचीच तारीख टाकण्यात आली आहे. यामुळे अडचणीत असलेल्या सर्वांचीच गुरुवारी सुट्टीच्या दिवशी देखील सारवासारव करण्यासाठी रजिस्टर मध्ये बदल करताना मोठी धावपळ पाहायला मिळाली.  
याबाबत असे कि, वाळुज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील गुलाब महिला बचत गटाकडून टी एच आर आहाराचा पुरवठा केला जातो. परंतु सदरील बचत गटाकडून जून महिन्यातला पुरवठा वेळेत केला गेला नाही तर जुलै व ऑगस्ट या महिन्यांचा पुरवठा अद्याप केला नाही. यामुळे परिसरातील 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता पोषण आहारापासून कोरोना संकटात वंचित आहे. सदरील प्रकरण अंगलट येत असल्याचे जाणवल्याने अधिकारी व ठेकेदार यांनी अंगणवाडी सेविकांना खोटे रेकॉर्ड करून जून महिन्यामध्ये टीएचआर वाटल्याचे भासविले आहे. परंतु सदरील प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो यासाठी अनेक अंगणवाडी सेविकांनी पोहच पावती आणि पंचनामा करताना बुधवार १८ ऑगस्टची तारीख टाकली आहे तर त्याच पावतीवर १७ जून २०२१ रोजी पुरवठा केल्याचा दिनांक टाकण्यात आला आहे. यामुळे पुरवठादाराचा तारीख झाकण्याचा डाव फसला.  
सदरील प्रकरणाचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व आशा सेविकांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत सर्व अशा सेविकांना टीएचआर रजिस्टर, पावत्या घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीत राजकीय आणि वरिष्ठांच्या दबावाला बळी पडून केलेल्या चुका अंगलट येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या देखील करण्यात आल्या. तर अनेक आशा सेविकांनी अद्यापही पोषण आहार वाटप न केल्याने त्यांना तो अधिकाऱ्यांच्या समक्ष वाटण्याच्या सक्त सूचना देखील देण्यात आल्या.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here