Marathwada Sathi

रात्रपाळी न बदलण्यासाठी फौजदार ‘लाचे’च्या जाळ्यात…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : रात्रपाळीची न बदलण्यासाठी दोन हवालदारांना प्रतीमहा ६ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.११) अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात केली. राजकुमार उत्तमराव चांदणे (५८)असे आरोपी फौजदाराचे नाव आहे.

पोलिस आयुक्तालायातील दोन हवालदारांनी ही तक्रार केली होती. राखीव पोलिस उपनिरीक्षक म्हणून आरोपी राजकुमार चांदणे कार्यरत आहेत. आरोपीने त्यांच्या रात्रपाळीवरुन दिवस पाळी अशी केली. तक्रारदार यांना रात्रपाळीची ड्युटीच रहावी, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी राखीव फौजदार चांदणेंकडे विनंती केली. चांदनेंनी त्यांना मनासारखे काम हवे असेल तर प्रत्येकी तीन हजार यानुसार दोघांचे ६ हजार रुपये दरमहा देण्यास सांगितले.

तक्रारदार हवालदारांनी चांदणेंच्याविरोधात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ८ डिसेंबर रोजीलाचलुचपत प्रतिबंधक चे उपाधिक्षक रुपचंद वाघमारे आणि कर्मचाऱ्यानी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. आरोपीने लाच मागितल्याचे सिध्द झाले. आपली तक्रार झाल्याचा संशय फौजदार चांदणेला आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. दरम्यान तो रजेवर गेला होता. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आज याप्रकरणी आरोपीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविला.

या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.११) दुपारी फौजदार चांदणेला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चांदणे ची रवानगी हर्सुल कारागृहात केली. निवृत्तीला उरले होते अवघे काही दिवस आरोपी फौजदार चांदणे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. त्याने वयाची ५७ वर्ष काही महिने ओलांडली. राखीव निरीक्षक यांची बदली झाल्यामुळे चांदणेकडे पोलिस निरीक्षकपदाचा पदभार होता. यातच त्याने कर्मचाऱ्यांकडुन वसूली सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

Exit mobile version