Marathwada Sathi

महाराष्ट्रात भांग पिऊन सत्तेवर आले, भांग उतरली की सत्ता जाईल, आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत ;संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई :महाराष्ट्रात भांग पिऊन सत्तेवर आला आहात. भांग उतरली की सत्ता जाईल. कसबा पेठेतील जनताने भांग उतरवली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.माझ्या काही मित्रांना कुणीतरी भांग पाजली, असे वक्तव्य काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांचा रोख हा उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर आज पत्रकार परिषदेत सवाल करताच संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकेचे बाण सोडले.मित्रांना देवेंद्र फडणवीसांनीच भांग पाजली का?, असा सवाल करत संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांची भांग उतरली की सत्ता जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत. राज्यातील जनताही शुद्धीत आहे. कसबा पेठेतील जनतेनेही आपण शुद्धीत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची भांग काही अंशी उतरली असेल.

राऊतांना हक्कभंगाची नोटीसच मिळाली नाही
विधिमंडळाबाबत चोरमंडळ, असे वक्तव्य केल्याने संजय राऊतांविरोधात हक्कभंग नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर उद्या विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या नोटीशीला संजय राऊतांनी उत्तर दिलेले नाही. यावर संजय राऊत म्हणाले, मी गेले काही दिवस मुंबईत नसल्याने मला विधिमंडळाची नोटीस मिळाली नाही. मी विधिमंडळातील आमच्या सदस्यांशी चर्चा करून यावर पुढे काय उत्तर द्यायचे, याचा निर्णय घेऊ.संजय राऊत म्हणाले, मी विधिमंडळाचा अपमान होईल, असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझ चोरमंडळ हे विधान फक्त एका विशिष्ट गटापुरते मर्यादित होते. शिंदे गटाला संपूर्ण महाराष्ट्र चोर म्हणतो. त्यांना चोर म्हणणे चुकीचे नाही. त्यामुळे मीदेखील काही चुकीचे केलेले नाही. संपूर्ण विधिमंडळाबद्दल मी असे विधान करणे शक्यच नाही.

Exit mobile version