Marathwada Sathi

एकाच दिवसात राज्यातील करोना रुग्णांची संख्या दुप्पट;कोविडच्या XBB १.१६ व्हेरिएंटची लागण

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशभरात मध्यंतरी करोनाची साथ पूर्णपणे ओसरली होती. मात्र, आता करोनाच्या XBB 1.16 या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. कोविड साथीच्या काळात महाराष्ट्र हे करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या प्रमुख राज्यांपैकी एक होते. परंतु, महाराष्ट्रात योग्य नियोजनामुळे कोविडच्या दोन्ही लाटांच्यावेळी काही कालावधीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. परिणामी करोनाच्या बाबतीत नागरिक बरेच निर्धास्त झाले आहेत. परंतु, आता महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये बहुतांश जण हे XBB १.१६ ची लागण झालेले आहेत. कालचा म्हणजे मंगळवारचा दिवस हा महाराष्ट्राच्यादृष्टीने चिंता वाढवणारा ठरला. कारण मंगळवारी एकाच दिवसात राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्येचा आलेख हा सातत्याने चढता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला राज्यात सर्वाधिक रुग्ण हे कोविडच्या XBB १.१६ व्हेरिएंटची लागण झालेले आहेत. राज्यात सोमवारी २०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी नव्या करोना रुग्णांचा आकडा ४५० इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे एकाच दिवसात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. ही गती कायम राहिल्यास राज्यात पूर्वीसारखी भयानक परिस्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. कोविडच्या XBB १.१६ व्हेरिएंटमुळे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी सहव्याधी असलेल्या रुग्णांना करोनाची लागण होणे, चिंताजनक ठरू शकते. मंगळवारी राज्यात नोंदवल्या गेलेल्या करोना रुग्णांची संख्या ही गेल्या १५२ दिवसांमधील सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यापूर्वी २७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात ९७२ करोना रुग्ण सापडले होते. मंगळवारी राज्यात तीन करोना रुग्णांचा मृत्यूही झाला. त्यामुळे मार्च महिन्यातील करोना मृतांचा आकडा हा १७ वर जाऊन पोहोचला आहे. नोव्हेंबर २०२२ नंतर करोना मृतांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

Exit mobile version