Marathwada Sathi

पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या ; १८ वर्षानंतर परतल्या ‘स्वदेशी’…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : १८ वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या ६५ वर्षीय औरंगाबादच्या हसीना बेगम भारतात परतल्या आहेत.१८ वर्षांअगोदर हसीना आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या.मात्र,तिथे पोहोचल्यावर लाहोरमध्ये त्यांचे पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आले नाही.पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद करण्यात आले होते.या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी(२६ जाने.)त्या भारतात परतल्या आहेत.

दरम्यान,मायदेशी परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की,”मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटत आहे की मी स्वर्गात आहे.मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आले होते. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते’असे त्या म्हणाल्या.हसीना यांना भारतात परत आणण्यासाठी मदत करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी आभार मानले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता.आपण निर्दोष असल्याचे हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितले होते.त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली.हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले.

Exit mobile version