Marathwada Sathi

अदानी समूहाच्या शेअर्सवर महत्वाची अपडेट

मुंबई : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने प्रवर्तकांचे किती शेअर्स तारण ठेवले आहेत याबाबत माहिती उघड करण्यात आली आहे. यानुसार समूहातील चार कंपन्यांचे काही शेअर्स अजूनही तारण असून यामध्ये अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या शेअर्सचा समावेश आहे. मात्र, ३१ डिसेंबर २०२२ च्या तुलनेत या शेअर्सची संख्या लक्षणीयरीत्या खाली घसरली आहे.
अदानी समूहाच्या माहितीनुसार अदानी पोर्ट्सचे ४.७ टक्के, अदानी ट्रान्समिशनचे ३.८ टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचे ३.५ टक्के आणि समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे ०.६% तारण ठेवण्यात आले आहेत. मात्र, ३१ डिसेंबर २०२२ च्या तुलनेत समूहाच्या तारण शेअर्सची संख्या लक्षणीयरीत्या खाली आली आहे. त्यावेळी अदानी पोर्ट्सचे १७.३ टक्के, अदानी ट्रान्समिशनचे ६.६ टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचे ४.४ टक्के आणि समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचे २.७ टक्के बँकांकडे गहाण ठेवले होते. या काळात समूहाने २.१ अब्ज कर्जाची परतफेड केली करत तारण ठेवलेल्या शेअर्सची संख्या कमी झाली आहे.
दरम्यान, एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, कर्जाची परतफेड करण्याचा अदानी समूहाचा दावा पूर्णपणे खरा नाही. अहवालात म्हटले की, समूहाने २.१ अब्ज डाॅलर कर्जाची परतफेड केल्याचा दावा केला आहे. मात्र, नियामक फाइलिंगमध्ये प्रवर्तकांच्या तारण शेअर्सच्या संख्येत घट झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत.यूएस-आधारित शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबद्दल नकारात्मक अहवाल जारी केला. यानंतर महिनाभराहून अधिक काळ अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. समूहाचे मार्केट कॅप १२५ अब्ज डाॅलरने कमी झाले. गौतम अदानी देखील जगातील श्रीमंतांच्या यादीत २० व्या स्थानावरून खाली फेकले गेले. यामुळे अदानी समूहाला आपली रणनीती बदलावी लागली. गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी व्यवसाय वाढवण्याऐवजी समूह कर्ज कमी करण्यात गुंतला आहे.

Exit mobile version