Marathwada Sathi

कोणत्या जयंत पाटील बद्दल बोलताय राणे मला माहित नाही

मराठवाडसाथी न्यूज
पुणे : महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यापासून भाजप नेते नारायण राणे आणि राणे यांचे दोन्ही पुत्र अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत असून त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीका सत्र सुरूच ठेवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नारायण राणेंवर जोरदार पलटवार केला होता.‘गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते,’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. ‘राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही,’ असं देखील ते म्हणाले होते. आता, जयंत पाटील यांना नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपात असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती” असा खळबळजनक दावा राणेंनी केला आहे.दरम्यान, जयंत पाटील यांनी राणेंचा हा दावा फेटाळून लावला असून भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली नसल्याचा खुलासा केला आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते, ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे.

Exit mobile version