Marathwada Sathi

भीषण : भरधाव कार थेट दुभाजकावर चढली


औरंगाबाद : आकाशवाणी चौकाकडून सिडकोच्या दिशेने जाणारी भरधाव कार थेट सेवन हिल उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढली. हा भीषण अपघात मंगळवारी (२९ जुन) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडला. कार मालक अरुण टेकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ सुनील टेकाळे आणि मुलगा अथर्व टेकाळे (१८, एसबीओए शाळेसमोर, नंदादीप हाऊसिंग सोसायटी) हे औरंगपुरा येथून सिडको बस स्थानकाकडे कारने (एमएच-२०-ईजे- ९६१३) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा डबा आणण्यासाठी जात होते. आकाशवाणीकडून सेवन हिल उड्डाण पुलावर कार येताच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिली. हुलकावणी बसताच कार थेट दुभाजकाच्या मधोमध चढली. कार सुनील टेकाळे चालवत होते. उड्डाणपुलावरील दुभाजकावर कार अंदाजे ५० मीटर अंतरापर्यंत पुढे गेली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार टेकाळे यांच्या कारचा वेग अधिक होता.


अपघाताची माहिती कळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक शिर्के, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चव्हाण, अवध सोंगकलंगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत जिन्सी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली नव्हती.

Exit mobile version