Marathwada Sathi

‘लक्ष्मी बॉम्ब’मधून धार्मिक भावना दु:खावल्याचा आरोप, हिंदू सेना करणार निदर्शने

मुंबई । अक्षय कुमार अभिनित बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर वादंग उठले आहे. आता ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी यातील कंटेटवरही आक्षेप घेतला आहे. काहींनी यातून धार्मिक भावनांना ठेच पोहोचत असल्याचे म्हणत हा सिनेमा प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय हिंदू सेना या सिनेमाविरोधात मोर्चा काढणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे. याबाबत संस्थेने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. यात सिनेमा बॅन करण्याची मागणी केली आहे. सिनेमाचे नाव न बदलल्यास हिंदू सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता विरोध प्रदर्शन करेल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्वीटरवर असे म्हटले आहे की, या नावात हिंदू देवतेचा अपमान झाला आहे. हिंदू समुदायाच्या भावना यातून दुखावल्या गेल्याने त्यांनी जावडेकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. लक्ष्मी देवीच्या नावापुढे ‘बॉम्ब’ शब्दाचा वापर योग्य नाही, आम्ही ज्या देवीची पूजा करतो तिच्या नावापुढे बॉम्ब शब्द लागणे निंदनीय आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.
‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची भूमिका आहे. युट्यूबवर या सिनेमाचा ट्रेलर गेले अनेक दिवस ट्रेंड होत आहे.

Exit mobile version