Marathwada Sathi

ट्रेनमधील महिलांचे लपून व्हिडिओ शूट, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये तरुणाला सहप्रवाशांनी धुतलं

कल्याण : रेल्वेतील सहप्रवासी महिलांचे लपून छपून व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. विकृत तरुणाला इतर प्रवाशांनी रंगेहाथ पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवारी सकाळी पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस मध्ये घडली. त्याच्यावर कलम ३५४ ड आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विकृत तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अश्रफ (रा. बिहार) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो मागील दोन ते तीन दिवसांपासून याच गाडीने ये-जा करत होता. यावेळी सहप्रवासी महिलांचे व्हिडिओ तो तयार करत असल्याची तक्रार प्रवाशांनी पोलिसांकडे केली आहे.आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे येण्यासाठी निघालेल्या सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यात एक तरुण चढला. या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे चोरी छुपे व्हिडिओ तो बनवत असल्याची बाब सहप्रवाशांच्या लक्षात आली, यामुळे प्रवाशांनी त्याला या प्रकरणी जाब विचारला. मात्र त्याने प्रवाशांना उलट सुलट उत्तरे दिली.

यानंतर इतर प्रवाशांनी त्याला चोप देत पकडून ठेवले. या गाडीतून दररोज पुणे मुंबई दरम्यान नोकरदार प्रवासी मोठ्या संख्येने ये जा करतात. यामुळे मागील काही दिवसांपासून हा विकृत तरुण अशा प्रकारे या गाडीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असल्याचे या प्रवाशांनी हेरले होते. त्यामुळेच आज त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.दरम्यान सहप्रवाशांच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

Exit mobile version