Marathwada Sathi

बीड जिल्ह्याला ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे आरोग्य संजीवनी -चंदुलाल बियाणी

परळी उपजिल्हा रुग्णालयालाही अद्ययावत मशिनरी दिली उपलब्ध करून

परळी
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तदनंतर देशात आणि राज्यात कोरोनामुळे अतिशय गंभीर आणि खडतर परिस्थिती निर्माण झाली. राज्याचे मंत्री म्हणून खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली होती. निर्माण झालेल्या खडतर परिस्थितही ना.धनंजय मुंडे यांनी अतिशय उत्तुंग कामगिरी बजावली, आपल्या कामाचा आढावा सादर करणारे राज्यातील नव्हे तर देशातील ते एकमेव मंत्री आहेत. बीड जिल्ह्याला त्यांच्याच कार्यकाळात खूप मोठ्या आरोग्य सुविधा मिळू शकल्याने आरोग्य विभागाला नवसंजीवनी मिळाली आहे. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयास नुकतेच अद्ययावत एक्सरे मशीन दिले असून, लवकरच ईसीजी आणि सोनोग्राफी मशीन देण्यात येणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्ह्यासाठी व परळीसाठी आरोग्यदूत ठरले असल्याचे मत आरोग्य मित्रचे अध्यक्ष, नगरसेवक तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या मागील 8 महिन्यांच्या काळात ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. अंबाजीगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन अद्ययावत वैद्यकीय उपकरणे मिळवून दिली. त्याच बरोबर बीड जिल्ह्याला कोरोना तपासणी प्रयोगशाळाही अंबाजोगाई येथे निर्माण होऊ शकली. लोखंडी सावरगाव येथे अद्ययावत असे कोविड केअर सेंटर व अतिसंवेदनशील रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू जनसेवेत आला. स्वतः कोरोनाच्या संसर्गाशी झुंजत असतांनाही त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर बारकाईने नजर ठेवून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळेच मोठ्या संख्येने पेशंट असलेल्या बीड जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले. फक्त कोरोनाच नाही तर इतर आजाराच्या रुग्णांवरही उपचार कमी पडू नयेत याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश ना.धनंजय मुंडे यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. काल परळी उपजिल्हा रुग्णालयाला अद्ययावत अशी एक्स रे व ईसीजी मशीन त्यांनी मिळवून दिली. लवकरच अद्ययावत सोनोग्राफी मशिन परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येईल व रिक्त पदेही भरली जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे विशेष लक्ष देऊन ना.धनंजय मुंडे यांनी नवसंजीवनी मिळवून दिली आहे असे मत आरोग्य मित्रचे अध्यक्ष, नगरसेवक तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version