सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड
औरंगाबाद : पुंडलिक नगर भागात चोरट्यानी हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून २५ ते ३० हजाराचे साहित्य लांबविले. चोरांना दुकानात सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील हनुमान चौकात घडली.महेश रामेश्वर तोतला वय-४२ (रा.एन-२, सिडको) यांची हनुमान चौकातील धरतीधन कॉम्प्लेक्स मध्ये पुष्पक सॅनिटेशन अँड पेंट या नावाने हार्डवेअर साहित्य विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. तोतला याचे शेजारी राहणारे सकाळी मॉर्निंग वॉकला दुकानाच्या दिशेने जातात. त्यावेळी सकाळी सहा वाजेच्या सुमारास एकाला तोतला यांच्या दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती तोतला यांना दिली. तोतला यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी दुकानाचे सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते. पोलिसांना कळविले. तोतला यांच्या दुकानातील गिझर व लहान मोठे साहित्य असा सुमारे २५ ते ३० हजाराचा ऐवज चोरानी लंपास केला. तोतला यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मध्ये तीन चोरटे दिसत आहे. मात्र दुकानात कॅमेरे असल्याचे कळताच चोरट्यानी ते सिसिटीव्ही फोडले. यात सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.