Marathwada Sathi

फडणवीसांच्या घोषणेवरून आजींचा बसमध्ये राडा

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास करणाऱ्या योजनेचे उद्घाटन २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता एसटीत महिलांना १७ मार्चपासून निम्या भाड्यात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे एसटीत महिला प्रवासी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केवळ घोषणा झाली असली तरी अद्याप एसटी मंडळाकडे प्रशासकीय जीआर आलेला नाही. अर्थात आता या दिरंगाईची माहिती सामान्य महिला प्रवाशांना नसावी म्हणूनच आता बसमध्ये एका आजींनी बेधडक वाद घालून कंडक्टरलाच सुनावले आहे. या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गोविंद शिवाजी मुंडे हे एसटी वाहक दत्तापूर ते लातूर ही बस घेऊन लातूरकडे येत असताना कामखेडा येथून सविता पोपट माने ही महिला एसटी बस मध्ये चढली. सविता यांनी तिकिटाचे अर्धे पैसे दिले. अर्थात कंडक्टर मुंडे यांनी सविता यांच्याकडे पूर्ण पैशांची मागणी केली ज्यावरून वादाला तोंड फुटले. सविता यांनी, “महिलांना अर्ध्या पैशात तिकीट झालंय, नेमानं तिकीट घ्यायचं, जास्त आगाव बोलायचं नाही, चला कायदा दाखवते तुम्हाला, आता कोणत्याही कार्डाची गरज नाही, महिलांना हाफ तिकीट झालंय” अशा सलग युक्तिवादाने कंडक्टरवर आगपाखड केली.

प्रवाशांनी सुद्धा सविता यांना समजावण्याचा प्रयत्न केला अखेरीस त्या कामखेडा येथे बसमधून उतरल्या. बरं एवढ्यावरच हा वाद थांबला नाही उलट सविता यांनी आपल्या लेकाला बोलावून घेतलं. मग सविता यांच्या लेकाने म्हणजेच गोटू माने नामक तरुणाने चक्क बस वाटेत थांबवून कंडक्टरला शिवीगाळ व मारहाण केली. परत दिसलास तर जीवे मारू अशीही धमकी दिली.दरम्यान, याप्रकरणी जखमी वहक गोविंद मुंडे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version